पिकांची फेरपालट :-
वाणांची निवड :-
सध्यस्थितीत बाजारात अनेक बी टी कपाशीचे संकरित वाण उपलब्ध आहेत. यापैकी कोणता वाण निवडावा याबाबत शेतक-यांमध्ये संभ्रम होत आहे. बी टी कपाशीचा वाण निवडताना कोरडवाहू किंवा बागायती लागवडीचा प्रकार व वाणाचे गुणधर्म यांचा विचार करावा. आपल्या भागात उत्पादनात सरस असणारा वाण निवडावा. रस शोषण करणा-या किडींना सहनशील/ प्रतिकारक्षम संकरित वाण असावा. रोगांना (मर, दहिया इ.) बळी न पडणारा वाण निवडण्यात यावा. पाण्याचा ताण सहन करणारा वाण निवडावा. बोंडाचा आकार बागायती लागवडीसाठी मोठा व कोरडवाहू लागवडीसाठी मध्यम असावा. बागायती लागवडीसाठी पुनर्बहारक्षमता असणारा वाण निवडावा. शेवटपर्यंत पाने हिरवी राहिल्यास अन्न तयार करण्याचे काम अखेरपर्यंत चालते. त्यामुळे उशिरा लागणा-या बोंडाचा सुध्दा आकार मोठा राहतो व बोंडे फुटण्याचे प्रमाण वाढते. बागायती लागवडीसाठी उशिरा येणारे तर कोरडवाहू लागवडीसाठी लवकर तयार होणारे वाण निवडावे.
बागायती लागवडीसाठी उशिरा येणारे तर फुटणारा व धाग्याची प्रत चांगली असणारा वाण निवडावा. ज्यामुळे कपाशीला बाजारभाव चांगला मिळू शकेल. वरील गुणधर्माप्रमाणे आपला मागील हंगामातील स्वतःचा अनुभव तसेच आपण स्वत: अन्य शेतक-यांच्या शेतावरील पीक पाहून बी टी कपाशीच्या वाणाची निवड करण्यात यावी. अधिक उत्पादन देणारे वाण बाजारात उपलब्ध असून त्यांची गुणधर्मानुसार योग्य नियोजन व व्यवस्थापनानुसार लागवड न केल्यास निश्चितपणे चांगले उत्पादन मिळेल.
पेरणीची वेळ :-
मराठवाड्यामध्ये बागायती कापूस पिकाची लागवड मे महिन्याच्या शेवटचा आठवडा ते जूनच्या पहिल्या आठवड्यात करावी. तर कोरडवाहू कापूस पिकाची लागवड मान्सूनचा तीन-चार इंच पाऊस पडल्यानंतर करावी. पेरणी योग्य वेळेवर करणे आवश्यक आहे. १५ जुलैनंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट येते. त्यामुळे यानंतर पेरणी करु नये. पेरणीस एक आठवडा उशीर झाल्यास उत्पादनात एक क्विंटल पर्यंत घट होऊ शकते.
बी. टी कपाशीसाठी पेरणीचे अंतर :-
बी टी कपाशीमध्ये वाढणा-या बोंडाकडे उपलब्ध अन्नद्रव्यांचे वहन होत असल्यामुळे झाडाची जमिनीस समांतर (आडवी) वाढ कमी होत असून फळफांद्याची लांबी कमी झाल्याचे आढळून येत आहे. यामुळे बी टी कपाशीची लागवड कमी अंतरावर करुन हेक्टरी झाडांची संख्या वाढविणे शक्य झाले आहे. रोपांच्या आवश्यकतेपेक्षा जास्त संख्येमुळे कापूस पीक संख्या अपर्याप्त झाल्यास पीक उत्पादनात घट येईल. म्हणून पेरणीचे अंतर योग्य असावे.
बीटी कापूस कोरडवाहू लागवड : १२० x ४५ सें.मी. (४ x १.५ फूट) अंतरावर करावी.
बी टी कापूस बागायती लागवड : १५o x ३० सें.मी. (५ x १ फूट) किंवा १८o x ३० सें.मी. (६ x १ फूट) अंतरावर करावी.
आश्रयात्मक (रेफ्युजी) ओळी : बोंडअळ्यांनी बी टी कापसाच्या झाडांवर प्रादुर्भाव केल्यानंतर काही वर्षांनी त्यांच्या पुढील पिढ्यामध्ये बी टी प्रथिनाविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार होण्याची शक्यता आहे. जर बोंडअळ्यांचा बी टी कापसाच्या बरोबरच विना बी टी कपाशीवर प्रादुर्भाव झाला तर त्यांच्यामध्ये बी टी प्रथिनाविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार होणार नाही. म्हणून बी टी कपाशीच्या पॅकेटमध्ये देण्यात आलेले बी टी विरहीत कपाशीचे बियाणे बी टी कापसाच्या सर्व बाजूने पाच ओळींमध्ये लावणे आवश्यक आहे. यास आश्रयात्मक ओळी असे म्हणतात.
यामुळे बोंडअळ्यांमध्ये बी टी टॉक्सीन विरुद्ध प्रतिकारशक्ती तयार होण्यास अटकाव होईल. बरेच शेतकरी बी टी विरहीत काही ओळींमुळे चालू हंगामातील उत्पादन कमी होईल म्हणून बी टी विरहीत बियाण्याचा वापर करीत नाहीत असे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. परंतु बी टी कपाशीच्या उत्पादकतेतील शाश्वततेसाठी व या तंत्रज्ञानाच्या दीर्घकालीन फायदा घेण्यासाठी बी टी कपाशीसोबत बी टी विरहीत बियाणे लावणे नितांत आवश्यक आहे.
बीजप्रक्रिया : कपाशीमध्ये रोग व अन्नद्रव्ये व्यवस्थापनासाठी पुढीलप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. :-
काही बुरशीजन्य रोगांचा प्रसार बियाणाद्वारे होतो. त्यामुळे बियाणात थायरम/कॅप्टन/सुडोमोनास या बुरशीनाशकंची ३ ग्रॅम प्रति कि.ग्रॅ. बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. यामुळे मर, करपा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
पिकाच्या वाढीसाठी नत्रस्थिरीकरण करण्यासाठी व स्फुरद विरघळविणा-या जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. नत्र स्थिरीकरणासाठी अॅझेटोबॅक्टर/अॅझोस्पिरीलम या जिवाणू संवर्धकांची बीजप्रक्रिया करावी. यामुळे नत्रस्थिरीकरण केले जाते व नत्र खतांच्या मात्रेमध्ये बचत करता येते. जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करण्यासाठी २५ ग्रॅम प्रति कि.ग्रॅ. बियाणे या प्रमाणात जिवाणू संवर्धकाचे गुळाच्या पाण्यात घट्ट मिश्रण तयार करुन बियाण्यास चोळावे व सावलीत वाळवावे. बुरशीनाशक/ कोडनाशकाची प्रक्रिया केल्यानंतर जिवाणुसंवर्धकाची प्रक्रिया करावी.
आंतरपिके :-
कपाशीचे पीक निखळ घेण्याऐवजी त्यामध्ये आंतरपिके घेतल्यास त्या क्षेत्रापासून मिळणारे एकूण व निव्वळ आर्थिक उत्पन्न कपाशीपेक्षा अधिक मिळते. बी टी कपाशीमध्ये तूर, मूग, उडीद व सोयाबीन या कपाशीच्या ६ ओळीनंतर तुरीची १ ओळ किंवा कपाशीच्या ८ ओळीनंतर तुरीच्या २ ओळी घेणे ही आंतरपीक पद्धती महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणावर घेतली जाते. त्याचबरोबर उडीद व सोयाबीन ही आंतरपिके १:१ प्रमाणात (कापसाच्या एका ओळीनंतर आंतरपिकाची एक ओळ) घेतल्यास फायदेशीर सकल उत्पादन मिळते. कपाशीच्या लागवडीमध्ये ओळींतील अंतर शिफारशींपेक्षा जास्त ठेवल्यास दोन ओळींमध्ये वाढविल्यास त्याच क्षेत्रापासून अधिक आर्थिक उत्पन्न मिळू शकते. कोरडवाहू लागवडीमध्ये १२० x ४५ सें.मी. अंतरावरील लागवडीमध्ये मूग या आंतरपिकाची लागवड १:२ या प्रमाणात केल्यामुळे सर्वाधिक फायदेशीर उत्पादन मिळते. याप्रमाणे मुगाच्या आंतरपीक लागवडीसाठी प्रतिष्हेक्टरी ६-८ कि.ग्रॅ. बियाणे लागते.
अन्नद्रव्य व्यवस्थापन :-
बी टी कपाशीमध्ये सुरुवातीच्या बहाराचे रूपांतर बोंडामध्ये होण्याचे प्रमाण जास्त आहे. फुले व बोंडे गळण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे उत्पादनात वाढ होत आहे. अधिक उत्पादनाच्या प्रमाणात पिकाची अन्नद्रव्याची गरज देखील पूर्ण करणे आवश्यक आहे. कोरडवाहू व बागायती बी टी कापूस पिकास रासायनिक खतांच्या मात्रा देण्याच्या शिफारशी पुढीलप्रमाणे आहेत.
बी टी कापूस कोरडवाहू : १२०:६०:६० कि.ग्रॅ. नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टर
बी टी कापूस बागायती : १५o:७५:७५ कि.ग्रॅ. नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टर
शेतक-यांमध्ये पिकास द्यावयाची शिफारस केलेली मात्रा व प्रत्यक्ष वापरावयाच्या खताची मात्रा याबाबत गोंधळ झालेला दिसतो. याकरिता बाजारात उपलब्ध असलेल्या खतांनुसार विविध पर्याय पुढे देण्यात आले आहेत. कोरडवाहू व बागायती कापूस पिकासाठी प्रतिएकर खताची मात्रा देण्यासाठी बाजारातील रासायनिक खताच्या ग्रेडच्या उपलब्धतेनुसार पुढीलपैकी (अ, ब, क,ड आणि इ यापैकी कोणताही एक पर्याय निवडावा.)
ठिबक सिंचनाद्वारे खते देणे :-
कापूस लागवड ठिबक सिंचनावर करुनही बरेच शेतकरी खते जमिनीतूनच देतात. ज्या शेतक-यांनी कापूस ठिबक सिंचनावर लावला आहे. त्यांनी रासायनिक खते व्हेंव्युरीद्वारे ठिबक सिंचनाच्या माध्यमातूनच द्यावीत. ठिबक सिंचन संचाचा पूर्ण फायदा त्याद्वारे खते दिल्यानंतरच होतो. यासाठी आपल्या संचास व्हेंच्युरी (ठिबक संचातील पाण्यामध्ये विद्राव्य खत सोडणारे साधन) असणे आवश्यक आहे.
ठिबक सिंचनाद्वारे रासायनिक खतांची मात्रा :-
८o:४o:४0 कि.ग्रॅ. नत्र, स्फुरद, पालाश प्रति हेक्टर. ठीबक सिंचनातून खते देताना खते १०० दिवसांपर्यंत विभागून द्यावीत. किंवा स्फुरद खते पेरणीबरोबर मातीद्वारे दिली तरीही चालेल परंतु कापूस लागवड केल्यास नत्र व पालाशयुक्त खते व्हेंव्युरीद्वारेच द्यावीत.
ठिबक सिंचनाव्दारे देता येणारी विद्राव्य खते :- युरिया (४६:०:०), १९:१९:१९, मोनो पोटेंशियम फॉस्फेट (0:५२:३४), मोनो अमोनियम फॉस्फेट (१२:६१:०), पोटॅशियम नायट्रेट (१३:०:४५), सल्फेट ऑफ पोअॅश (0:0:५o), युरिया फॉस्फेट (१८:४४:o), अमोनियम सल्फेट, कॅशियम नायट्रेट.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें