दशपर्णी अर्क तयार करण्याची सोपी पद्धत!
.
हे उत्तम प्रतिचे कीडनाशक आहे. याचा उपयोग सेंद्रिय शेतीमध्ये केला जातो. यात दहा प्रकारच्या पानांचा अर्क वापरला जातो.
दशपर्णी अर्क वापरण्याचे फायदे:-
१. दशपर्णी अर्क फवारणी मुळे लहान अळ्या, रसशोषक कीड, कीडींची अंडी अवस्थेचे निर्मूलन होते.
२. उग्र वासामुळे किडी पिकामध्ये अंडी देण्यापासून परावृत्त होता.
३. सर्व पिकावर हा अर्क प्रभावी असल्याने रासायनिक कीटकनाशकांवर वेगळा खर्च करावा लागत नाही.
४. रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी झाल्याने पिकावर किटनाशकांचे अंश राहत नाहीत.
५. मित्रकिडीचे संवर्धन होऊन नैसर्गिक पद्धतीने कीड नियंत्रण होण्यास वाव मिळतो.
६. पर्यावरणपूरक कीड नियंत्रण झाल्याने सकस व विषमुक्त शेती उत्पादने मिळतात.
लागणारे साहित्य:-
• कडुलिंबाची पाने - ५ किलो
• करंजाची पाने - २ किलो
• निरगुडीची पाने - २ किलो
• टनटनीची पाने - २ किलो
• सिताफळाची पाने - ३ किलो
• रुईची पाने - २ किलो
• लाल कन्हेराची पाने - २ किलो
• पपईची पाने -२ किलो
• एरंडाची पाने - २ किलो
• पावशेर लसूण ठेचा
• हिरवी मिरची ठेचा २ किलो
• गुळवेलीची पाने - २ किलो
• गायीचे शेण - २ किलो
• गोमुत्र - ५ लिटर
• पाणी - १७० लिटर
• २०० लिटर पाण्याची टाकी
तयार करण्याची पद्धत:-
पहिल्यांदा एका २०० लिटर पाण्याच्या टाकीत १७० लिटर पाणी घेऊन देशी गायीचे शेण व गोमूत्र टाकून घ्यावे. हे मिश्रण एकत्रित करून चांगले काठीच्या साहाय्याने ढवळावे. २४ तासानंतर १० प्रकारच्या झाडांचा पाला चेचून या द्रावणात टाकावा. हे मिश्रन सावलीमध्ये ३० ते ४० दिवस आंबवत ठेवावे. ४० दिवसानंतर द्रावण ढवळून कापडाच्या साहाय्याने गाळावे. गाळून घेतलेला अर्क सावलीत साठवून ठेवावा. हा अर्क ६ महिन्यापर्यंत वापरू शकतो.
वापरण्याचे प्रमाण:-
तयार केलेला अर्क १० मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून त्याची पिकांवर फवारणी करावी.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें