तुडतुडे फिकट हिरव्या रंगाचे असून, पाचरीच्या आकाराचे असतात. त्यांची लांबी तीन ते चार मि.मी. लांब असते. तुडतुड्यांच्या पिल्लांना पंख नसतात. मात्र पूर्ण वाढलेल्या तुडतुड्यांना पंख असतात. समोरच्या पंखावर एकेक काळा ठिपका असतो. डोक्याच्या भागावर दोन काळे ठिपके असतात. ते नेहमी तिरके चालतात व चटकन उडी मारतात.
जीवनक्रम :-
मादी तुडतुडे पानांच्या ग्रंथीमध्ये एक एक अशी अंडी घालते. एक मादी तिच्या जीवनकाळात 30 अंडी घालू शकते, यातून चार-11 दिवसांत पिल्ले बाहेर पडतात. पिल्लांची वाढ सात-12 दिवसांत पूर्ण होऊन प्रौढांमध्ये रूपांतर होते.
नुकसानीचा प्रकार :-
तुडतुड्यांचे प्रौढ आणि पिल्ले पानांच्या खालच्या बाजूने राहून सोंडेने त्यातील रस शोषण करतात. त्यामुळे पिकाची वाढ खुंटते. तुडतुडे स्वतःच्या शरीराद्वारे मधासारखा चिकट पदार्थ सोडतात. त्यावर कॅप्नोडियम नावाची काळी बुरशी वाढते. त्याचा झाडाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो.
अधूनमधून होणारा हलकासा पाऊस, उष्ण व दमट हवामान, कमी सूर्यप्रकाश दीर्घकाळ राहिल्यास या किडीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो. जास्त प्रादुर्भाव झाल्यास अशी पाने प्रथम कडेने पिवळसर होऊन नंतर तपकिरी रंगाची होतात व संपूर्ण पाने लाल तांबडी होऊन त्यांच्या कडा मुरगळतात. अशा झाडांना पात्या, फुले आणि बोंडे फारच कमी प्रमाणात लागतात. संपूर्ण प्रादुर्भावग्रस्त झाडे वाळू शकतात. बऱ्याचदा किडींचा प्रादुर्भाव "लाल्या' विकृतीसोबत आढळून येतो. त्यामुळे नुकसानीची तीव्रता वाढते व शेतकरी "लाल्या' समजून वेगळीच उपाययोजना करतात.
प्रतिबंधत्मक उपाय :-
• पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे.
• प्रतिकारक किंवा सहनशील वाण वापरा (बाजारात बरेच वाण उपलब्ध आहेत).
• शिफारशीनुसार खताची मात्रा द्यावी.
• नत्राचा अतिरिक्त वापर टाळावा.
आपल्या पिकावर अशी काही लक्षणे दिसतील :-
• पाने पिवळसर आणि वरच्या बाजुला गोळा होतात.
• नंतरच्या टप्प्यांवर कडांपासुन तपकिरी रंगहीनता सुरु होते.
• वाळलेले पान गळतात.
• वाढ खुंटते.
नियंत्रणाचे उपाय :-
जैविक नियंत्रण :-
सामान्य हिरवे लेसविंग (क्रिसोपेर्ला कार्निया), ओरियस किंवा जिओकॉरीसच्या प्रजाती, कॉसिनेलिडसच्या आणि कोळ्यांच्या काही प्रजाती हे तुडतुड्याचे नेहमीचे भक्षक आहेत. त्या प्रजातींचा वापर करा आणि साधारणपणे कीटकनाशकांचा वापर टाळा. पहिले लक्षण दिसताच स्पिनोसॅड (०.३५ मि.ली./ली) वापरा.
रासायनिक उपाय :-
बाजारात उपलब्ध असलेल्या संकरित वाणांकरिता इमिडाक्लोप्रीड 70 डब्ल्यू.एस. पाच ते सात ग्रॅम प्रति कि.ग्रॅ. बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया केली असल्यामुळे 30 दिवसांपर्यंत तुडतुड्यांच्या प्रादुर्भावापासून संरक्षण होण्यास मदत होते. त्यामुळे नंतर कपाशीवर इमिडाक्लोप्रीड घटक असलेल्या कीडनाशकाची फवारणी टाळावी.
दोन-तीन तुडतुडे प्रति पान आढळून आल्यास 20 ग्रॅम ऍसिफेट (75 एस.पी.) किंवा चार ग्रॅम ऍसिटामिप्रीड (20 एस.पी.) किंवा चार ग्रॅम थायामेथॉक्झाम (25 डब्ल्यू.जी.) प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें